SONU WALKE,DEPUTY EDITOR,LOKWAD NEWS.
४७ अंशांच्या उन्हात दिवसभर सर्वेक्षण, रात्री जागून अभ्यास; शिक्षकांच्या संयमाची खरी परीक्षा.
चामोर्शी/गडचिरोली : राज्यात सुरू असलेल्या डिजिटल जनगणनेच्या कामामुळे शिक्षकांवर दुहेरी ताण निर्माण झाला असून, येत्या २८ जून रोजी होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) तयारीवर त्याचा गंभीर परिणाम होत असल्याची भावना शिक्षकांमध्ये व्यक्त होत आहे. एका बाजूला शासनाने जनगणनेचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत, तर दुसऱ्या बाजूला टीईटी परीक्षा अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपल्याने शिक्षकांची अक्षरशः कसरत सुरू झाली आहे.
मे महिन्यातील ४६ ते ४७ अंशांच्या कडक उन्हात शिक्षकांना घराघरांत जाऊन माहिती संकलन, पडताळणी तसेच ऑनलाइन नोंदणीचे काम करावे लागत आहे. सकाळपासून सायंकाळपर्यंत सुरू असलेल्या या धावपळीनंतर रात्री टीईटीचा अभ्यास करण्यासाठी आवश्यक मानसिक व शारीरिक ऊर्जा उरत नसल्याचे अनेक शिक्षकांचे म्हणणे आहे. परिणामी, परीक्षेची तयारी अपेक्षित प्रमाणात होत नसल्याने शिक्षकांमध्ये अस्वस्थता आणि नाराजी वाढताना दिसत आहे.
यंदाची टीईटी परीक्षा हजारो शिक्षकांच्या भवितव्याशी निगडित मानली जाते. सेवाशर्ती, पदोन्नती तसेच रोजगाराच्या संधींसाठी ही परीक्षा महत्त्वाची असल्याने शिक्षक गंभीरपणे तयारी करत होते. मात्र जनगणनेच्या अतिरिक्त जबाबदाऱ्यांमुळे अभ्यासाचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडल्याची खंत शिक्षकांनी व्यक्त केली आहे.
शिक्षक संघटनांनीही या परिस्थितीची दखल घेत टीईटी परीक्षा किमान एक महिना पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. “राज्यात सध्या भारतातील पहिली डिजिटल जनगणना सुरू असून, मोठ्या प्रमाणात शिक्षक या कामात गुंतले आहेत. त्यामुळे शिक्षकांना अनिवार्य असलेल्या टीईटी परीक्षेच्या अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. शासनाने शिक्षकांना न्याय देण्यासाठी परीक्षेची तारीख पुढे ढकलावी,” अशी मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष रोशन थोरात यांनी केली आहे.
: जिल्ह्यातील ८० टक्के शिक्षक जनगणनेच्या कामात व्यस्त
जिल्ह्यातील सुमारे ८० टक्के शिक्षक सध्या जनगणनेच्या कामात गुंतले असल्याचा दावा शिक्षक संघटनांकडून करण्यात येत आहे. परीक्षा अवघ्या काही आठवड्यांवर आली असताना अभ्यासाऐवजी शिक्षकांना सरकारी कामात झोकून द्यावे लागत असल्याने नाराजीचा सूर तीव्र होत आहे.
: सीटीईटी अर्ज, टीईटीचा अभ्यास आणि जनगणना; शिक्षकांची वाढली धावपळ
टीईटीसोबतच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) अर्ज प्रक्रिया देखील सुरू आहे. ५ जून ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख असल्याने शिक्षकांना जनगणनेच्या कामातून वेळ काढून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागत आहे. त्यामुळे आधीच तणावाखाली असलेल्या शिक्षकांची धावपळ आणखी वाढली असून, टीईटी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.