मार्कंडा देव परिसरात सुरू असलेल्या MSRDC च्या कथित बोगस व विस्कळीत कामपद्धतीमुळे भाविकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे. मंदिर दर्शनासाठी मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या वाहनांना ये-जा करण्यास मोठ्या अडचणी निर्माण होत असून, मुख्य रस्त्यावरच वाहतुकीची कोंडी होत आहे. परिणामी भाविकांसह स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे वाहतूक व्यवस्थापनासाठी कोणतेही प्रभावी नियोजन दिसून येत नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. गर्दीच्या काळात वाहनांची लांबच लांब रांग लागत असून, अनेकांना तासन्तास रस्त्यावर अडकून राहण्याची वेळ येत आहे. यामुळे धार्मिक स्थळावर येणाऱ्या भाविकांचा प्रवास त्रासदायक ठरत असल्याचे चित्र आहे.
नागरिकांनी ग्रामपंचायतीने तातडीने हस्तक्षेप करून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी योग्य नियोजन करावे, पर्यायी मार्गांची व्यवस्था करावी आणि संबंधित यंत्रणांनी कामाची गुणवत्ता व पद्धतीची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. परिस्थितीकडे दुर्लक्ष झाल्यास भाविकांचा संताप अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.