चामोर्शी, प्रतिनिधी : बहुचर्चित चामोर्शी–हरणघाट रस्त्याच्या पक्क्या बांधकामाला अखेर सुरुवात झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, कामासोबतच आता खोदकामातून निघालेल्या मातीच्या कथित विक्री प्रकरणामुळे नव्या वादाला तोंड फुटले असून नागरिकांनी या संपूर्ण व्यवहाराच्या चौकशीची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्याचे काम सुरू करताना दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले. या प्रक्रियेत निघालेली माती नियमानुसार गरजू शेतकरी, पाणंद रस्त्यांची दुरुस्ती किंवा सार्वजनिक उपयोगासाठी वापरणे अपेक्षित असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात ही माती खासगी व्यक्तींना विकण्यात आल्याचा गंभीर आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या संपूर्ण प्रकारात कामाशी संबंधित काही जबाबदार व्यक्ती व रोड इन्चार्ज यांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. खोदकामातून निघालेली माती शेकडो हायवा ट्रकमधून वाहतूक करण्यात आल्याचे सांगण्यात येत असून, प्रत्येक ट्रकसाठी सुमारे एक ते दोन हजार रुपये आकारण्यात आल्याची चर्चा परिसरात आहे. त्यामुळे या व्यवहारातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली असून, सरकारी कामातून निघालेली माती कोणाच्या परवानगीने देण्यात आली, त्यातून मिळालेली रक्कम कुठे जमा झाली आणि संपूर्ण प्रक्रियेत संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका काय होती, याचा तपास व्हावा अशी मागणी जोर धरत आहे. या कथित प्रकारामुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. गावातील पाणंद रस्ते दुरुस्ती किंवा गरजू शेतकऱ्यांना मातीचा लाभ मिळू शकला असता, मात्र काही लोकांनी वैयक्तिक फायद्यासाठी गैरप्रकार केल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर तातडीने कारवाई करून संपूर्ण आर्थिक व्यवहार जनतेसमोर आणावा, अशी मागणी एनएसयूआय जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे यांच्यासह साहिल धोबे, प्रशांत कूसराम, आयुष पाल, तेजस कोंडेकर, कुणाल आभारे आणि भेंडाळा परिसरातील नागरिकांनी केली आहे.
□ प्रतिक्रिया □ “अशा प्रकारचा कोणताही गैरव्यवहार झालेला नाही. आम्ही परस्पर कुणालाही माती विकलेली नाही. जे गरजू शेतकरी होते त्यांनी ही माती नेली आहे.” — प्रणब साना, रोड इन्चार्ज.