Homeगडचिरोलीशेवटच्या श्वासापर्यंत सुपीक शेतजमिनी अधिग्रहित होऊ देणार नाही; धरणे आंदोलनात शेतकऱ्यांचा एकसुर...

शेवटच्या श्वासापर्यंत सुपीक शेतजमिनी अधिग्रहित होऊ देणार नाही; धरणे आंदोलनात शेतकऱ्यांचा एकसुर विमानतळ व विविध प्रकल्पांविरोधात काँग्रेसच्या धरणे आंदोलनात हजारो शेतकऱ्यांचा एल्गार.

सोनू वाळके, उपसंपादक, लोकवाद न्युज.

 

गडचिरोली | प्रतिनिधी
गडचिरोली जिल्ह्यात विविध एमआयडीसी प्रकल्प व इतर विकास कामांच्या नावाखाली सुपीक शेतजमिनी अधिग्रहित करण्याच्या प्रक्रियेविरोधात शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला असून, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली भव्य धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, शेतकरी, महिला व युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
गडचिरोली तालुक्यात प्रस्तावित विमानतळासाठी गुरुवाडा, हिरापूर, शिरपूर, राखी, चांदाळा, जांभळी आदी गावांमध्ये शेतकऱ्यांचा विरोध असतानाही प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. तसेच चामोर्शी तालुक्यातील प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पासाठी १४ गावांतील शेतजमिनी अधिग्रहित करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू असल्याचा मुद्दाही आंदोलनात उपस्थित करण्यात आला.
यावेळी शेतकऱ्यांनी सरकारवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत, “माती ही आमची माय आहे आणि या मातीच्या रक्षणासाठी आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करू,” अशी भूमिका स्पष्ट केली.
काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी सरकारवर निशाणा साधत सांगितले की, शेतकऱ्यांच्या हिताविरोधात निर्णय घेतले जात असून प्रशासनाकडून शेतकऱ्यांवर दबाव आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारने गंभीर भूमिका घेतली नाही तर येत्या ४ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
तर खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत, “शेतकऱ्यांची भूमिका हीच आमची भूमिका असून त्यांच्या हक्कासाठी आम्ही ठामपणे लढू,” असे स्पष्ट केले.
या आंदोलनात विविध पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच हजारो शेतकरी, महिला आणि युवक उपस्थित होते. आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर आता संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून, प्रशासन पुढे काय भूमिका घेते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments