चामोर्शी, दि. १५ मे : चामोर्शी नगरपंचायतीत विविध विभागांची संयुक्त आढावा बैठक आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. शहरातील प्रलंबित प्रश्न, नागरिकांच्या तक्रारी आणि विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेताना प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. “कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा आमदारांनी दिला. बैठकीत सुरुवातीलाच शहरातील वाढत्या अवैध धंद्यांचा मुद्दा गाजला. वाळवंटी चौकासारख्या गजबजलेल्या भागात खुलेआम अवैध दारूविक्री सुरू असताना पोलीस प्रशासन नेमके काय करत आहे? असा थेट सवाल उपस्थित करण्यात आला. कायदा-सुव्यवस्था आणि अवैध व्यवसायांबाबत कुठलीही तडजोड स्वीकारली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. महावितरणच्या कारभारावरही बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त झाली. वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, तांत्रिक त्रुटी आणि नागरिकांच्या तक्रारींकडे होणारे दुर्लक्ष यावर अधिकाऱ्यांना धारेवर धरत तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले. दरम्यान, बैठकीत आणखी एक गंभीर मुद्दा चर्चेत आला. चामोर्शीसारख्या मोठ्या तहसील क्षेत्रात नगरपंचायत हद्दीत बोरवेलची संख्या अत्यल्प असल्याचे निदर्शनास आले. काही बोरवेल नादुरुस्त अवस्थेत असून नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. दुसरीकडे तुलनेने लहान असलेल्या लालडोंगरी भागात तब्बल ४० ते ४५ बोरवेल असल्याचे समोर आले. यामुळे निधी वितरणात असमतोल झाला का? निधीचा गैरवापर झाला का? आणि यामागील निकष काय होते? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. स्थानिक स्तरावर आता या बोरवेल प्रकरणाच्या खर्चाचा आणि मंजूर निधीचा तपशील सार्वजनिक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना प्रशासनाने याबाबत पारदर्शक भूमिका घेणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. बैठकीत आरोग्य सेवा, तलाव स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण आणि घरकुल योजनांतील प्रलंबित कामांवरही अधिकाऱ्यांना ठोस कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. “प्रशासनाच्या बैठका कागदापुरत्या न राहता त्याचा परिणाम नागरिकांना दिसला पाहिजे,” अशी भूमिका आमदारांनी मांडत कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट केले.यावेळी डॉ. भारत खटी, तालुकाध्यक्षा रोशनीताई वरघंटे, सोपान नैताम, माणिकजी कोहळे, श्रावण सोनटक्के, रेवनाथ कुसरम, नरेश अलसावार,निरज रामानुजनवार, तसेच उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, तहसीलदार प्रशांत घोरुडे,पोलीस निरीक्षक दीपक डोंब, नगराध्यक्षा सौ. जयश्रीताई वायललवार व सर्व विभागीयविभागीय सभापती,नगरसेवक तसेच विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी नागरिक उपस्थित होते.