सोनू वाळके, उपसंपादक, लोकवाद न्युज.
आरमोरी, दि. १६ मे : आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव परिसरात लागलेल्या भीषण वनव्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच आमदार रामदासजी मसराम यांनी घटनास्थळी धाव घेत नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली.
वनव्यामुळे शेतात काढून ठेवलेला मका व जमा करून ठेवलेले मका पूंजे आगीत जळून खाक झाले. तसेच शेतकऱ्यांचे मोटार पंप, पाण्याचे पंप, डीपी आणि शेतीसाठी वापरले जाणारे इतर साहित्यही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. अचानक लागलेल्या आगीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
याशिवाय परिसरातील भाजीपाला पिकांचेही नुकसान झाले असून आंबा व फणसाच्या झाडांसह त्यावरील फळेही जळून खाक झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हंगामी उत्पन्नावरही मोठा परिणाम होणार असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
घटनास्थळी आमदार रामदासजी मसराम यांनी तलाठी कात्रटवार यांच्यासोबत शेतशिवारात फिरून नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच प्रशासनाला तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्तांना मदत देण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी शासनाकडे नुकसानभरपाईसाठी पाठपुरावा करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन आमदार रामदासजी मसराम यांनी दिले.
या पाहणीवेळी काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, धनपालजी मिसार, राजूभाऊ सामृतवार, तलाठी कात्रटवार, विनोद बारस्कर, किशोर तोरणकर यांच्यासह परिसरातील नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.