धानोरा/गडचिरोली::- धानोरा तालुक्यातील धानोरा ते मुंगनेर पेंढरी मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांसह नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी डांबरीकरण पूर्णपणे उखडून गेले असून हा रस्ता नेमका डांबरी आहे की खड्ड्यांचा पट्टा, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. मागील दोन वर्षांपासून या मार्गाच्या दुरुस्तीची मागणी सातत्याने करण्यात येत असतानाही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्याची आणखी बिकट अवस्था होत असल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. विशेषतः शालेय विद्यार्थी, रुग्णवाहिका सेवा, शेतकरी आणि रोजच्या कामानिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांना या खराब रस्त्याचा मोठा फटका बसत आहे. पावसाळा तोंडावर असताना तरी संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. या गंभीर समस्येकडे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन धानोरा–मुंगनेर पेंढरी मार्गाची तात्काळ दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे.