🥋 राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत मूलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी
परी मांदाडेला सुवर्ण, साचितला कांस्य पदक
देहरादून येथे होणाऱ्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी परी मांदाडेची निवड
मूल प्रतिनिधी : नाशिक येथील विभागीय क्रीडा संकुलात कराटे डू असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय कराटे क्रीडा स्पर्धेत मूल शहरातील कराटे अँड फिटनेस क्लबच्या खेळाडूंनी उज्ज्वल यश संपादन करत शहराचे नाव राज्यभर गाजवले. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या खेळाडूंमध्ये मूलच्या खेळाडूंनी आपले कौशल्य सिद्ध करत एक सुवर्ण व एक कांस्य पदक पटकावले.
स्पर्धेत १२ वर्ष मुलींच्या ५५ किलो आतील वजनगटात परी प्रभाकर मांदाडे हिने अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. तर १० वर्ष आतील मुलांच्या ४५ किलो वजनगटात साचित प्रभाकर मांदाडे याने कांस्य पदक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली.
या शानदार यशासोबतच सुवर्णपदक विजेती परी मांदाडे हिची जून महिन्यात देहरादून (उत्तराखंड) येथे होणाऱ्या KIO Sub Junior, Cadet & Junior National Karate Championship-2026 स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या राष्ट्रीय स्पर्धेत ती महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार असल्याने मूल शहरासाठी ही अभिमानाची बाब ठरत आहे.
विशेष म्हणजे, परी मांदाडे हिने यापूर्वीही राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावत इंदौर येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय कराटे स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. तिच्या सातत्यपूर्ण यशामुळे क्रीडा क्षेत्रात तिचे विशेष कौतुक होत आहे.
स्पर्धेदरम्यान प्रशिक्षक निलेश गेडाम यांनी खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच खेळाडूंचे पालक प्रभाकर मांदाडे हे देखील स्पर्धास्थळी उपस्थित राहून मुलांना प्रोत्साहन देत होते.
परी व साचित यांच्या यशाबद्दल जून्सेई शोतोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय प्रमुख विनय बोढे, तालुका कराटे-डो असोसिएशन मूलचे अध्यक्ष तथा कराटे अँड फिटनेस क्लब मूलचे संचालक-प्रशिक्षक इम्रान खान, प्रशिक्षक निलेश गेडाम, सहप्रशिक्षक साक्षी गुरनुले तसेच पालकवर्ग यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.







