Homeगडचिरोलीदीड दशकांपासून अर्धवट पूल; रांगी-जांभळी मार्गावरील नागरिकांचा संताप टोकाला.

दीड दशकांपासून अर्धवट पूल; रांगी-जांभळी मार्गावरील नागरिकांचा संताप टोकाला.

सोनू वाळके, उपसंपादक,लोकवाद न्युज.

 

धानोरा | 12 मे 2026
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील रांगी-जांभळी मार्गावरील नाळेवाही नाल्यावर सुरू असलेले पुलाचे बांधकाम तब्बल दीड दशकांपासून अर्धवट अवस्थेतच पडून असल्याने स्थानिक नागरिकांचा संताप तीव्र झाला आहे. दरवर्षी पावसाळ्यात जीव धोक्यात घालून पाण्यातून मार्गक्रमण करण्याची वेळ ग्रामस्थांवर येत असून शासन-प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात आता आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशकांहून अधिक काळ लोटला असला तरी तालुक्याच्या शेवटच्या टोकावरील जांभळी, दवंडी परिसरातील नागरिक आजही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करत असल्याचे चित्र आहे. रांगी-जांभळी मार्गावरील नाळेवाही नाल्यावर पुलाचे बांधकाम अनेक वर्षांपूर्वी सुरू झाले; मात्र आजही ते अर्धवट अवस्थेत असल्याने नागरिकांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
स्थानिक ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींना वारंवार निवेदने देऊन पुलाची मागणी केली. मात्र आश्वासनांपलीकडे कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रणय खुणे यांच्या पुढाकाराने आता स्थानिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून, “तात्काळ पुलाचे बांधकाम सुरू करावे; अन्यथा बेमुदत उपोषणासह विराट जनआंदोलन छेडले जाईल,” असा इशारा देण्यात आला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, पुलाअभावी रांगी, जांभळी आणि दवंडी येथील नागरिकांना आठवडी बाजार, बँक व्यवहार तसेच शासकीय कामांसाठी जीव मुठीत धरून नाल्यातून प्रवास करावा लागतो. विशेषतः पावसाळ्यात परिस्थिती अधिक बिकट बनत असून विद्यार्थ्यांपासून रुग्णांपर्यंत सर्वांनाच याचा फटका बसत आहे.
मानवाधिकार संघटनेच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष पाहणी करून ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी अनंती पदा (सरपंच, जांभळी), आसाराम ताडाम, देवराव उसेंडी, रागीनी उसेंडी, अनुसया ताडाम, बारीकराव उसेंडी, देवनाथ कुमोटी, निरंगशहा हलामी, नेताजी हुरा, काशिनाथ गोटा, राजू टेकाम, श्रीराम ताडाम, बाबुराव उसेंडी, मनिराम हारामी, रेवन उसेंडी, सुरेश परसा, मनीराम पदा यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments