चामोर्शी प्रतिनिधी : तालुक्यातील खंडाळा ते डोटकुली मार्गाच्या खडीकरण व मजबुतीकरणाच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तब्बल 29 लाख रुपयांचा निधी खर्च करूनही रस्ता अल्पावधीतच उखडू लागल्याने संबंधित ठेकेदारांच्या कामकाजावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. “काम पूर्ण झाले, पण रस्ता वापरण्यायोग्यच नाही,” अशी तीव्र प्रतिक्रिया ग्रामस्थांतून उमटत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित ठेकेदाराने मनमानी पद्धतीने अतिशय निकृष्ट दर्जाचे काम केले. रस्त्यावर योग्य दाब न देणे, निकृष्ट साहित्याचा वापर आणि कामातील निष्काळजीपणामुळे रस्त्याची अवस्था काही दिवसांतच दयनीय झाली आहे. परिणामी नागरिकांना दैनंदिन प्रवास करताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, काही दिवसांतच मान्सूनला सुरुवात होणार असल्याने हा मार्ग अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यात रस्त्यावर चिखल, खड्डे आणि घसरडी परिस्थिती निर्माण होऊन अपघातांचा धोका वाढण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या संपूर्ण प्रकरणात प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून “प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्याचा परवाना रद्द करावा, तसेच संपूर्ण कामाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी परिसरातून होत आहे. ग्रामस्थांच्या आक्रोशानंतर आता संबंधित विभाग तातडीने जागा होणार का, की नागरिकांना पुन्हा आश्वासनांचाच डांबरी रस्ता दाखवला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.