HomeBreaking NewsRO नावाखाली फसवणूक? उन्हाळा व लग्नसराईत वाढती मागणी; थंड पाणी देऊन नागरिकांच्या...

RO नावाखाली फसवणूक? उन्हाळा व लग्नसराईत वाढती मागणी; थंड पाणी देऊन नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

📰 RO नावाखाली फसवणूक? उन्हाळा व लग्नसराईत वाढती मागणी; थंड पाणी देऊन नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

मूल : प्रतिनिधी
सध्या तीव्र उन्हाळ्याचे दिवस सुरू असून त्यातच लग्नसराईचा हंगाम जोरात सुरु आहे. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरात पिण्याच्या पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र याच परिस्थितीचा फायदा घेत काही व्यावसायिकांकडून “RO शुद्ध पाणी” नावाखाली केवळ थंड केलेले पाणी विकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ होत असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनेक ठिकाणी RO प्लांट असल्याचे सांगून नागरिकांना पाण्याचे कॅन्स पुरवले जात आहेत. परंतु प्रत्यक्षात पाण्यावर आवश्यक ती शुद्धीकरण प्रक्रिया केली जात नसून, फक्त थंड करून त्याची विक्री केली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
उन्हाळ्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची गरज भासत आहे. त्यातच लग्नसमारंभ, धार्मिक कार्यक्रम, सामाजिक सोहळे आणि विविध सार्वजनिक कार्यक्रमांमुळे पाण्याचा वापर अनेकपटींनी वाढला आहे. लग्नसराईच्या काळात मोठ्या प्रमाणावर पाण्याच्या कॅन्सची मागणी होत असल्याने पाण्याच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, योग्य प्रकारे फिल्टर न केलेले पाणी पिणे धोकादायक ठरू शकते. अशा पाण्यामुळे जुलाब, टायफॉईड, पोटदुखी, उलट्या तसेच इतर पाण्यातून पसरणाऱ्या आजारांचा धोका वाढू शकतो. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांसाठी हे अधिक धोकादायक ठरू शकते.
शहरातील काही नागरिकांनी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली आहे. संबंधित पाणी विक्रेत्यांची तपासणी करून पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावेत तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, नागरिकांनी पिण्याचे पाणी घेताना जागरूक राहावे, पाण्याचा दर्जा तपासूनच वापर करावा तसेच संशयास्पद प्रकार आढळल्यास प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments