मे 2025 पासून मानधन ठप्प; पूर्ववत नियुक्ती व थकीत मानधनासाठी प्रशासनाला साकडे
आझाद समाज पार्टीचे जिल्हा युवा अध्यक्ष विवेक खोब्रागडे यांचा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा.
गडचिरोली : नक्षलग्रस्त भागात जीव धोक्यात घालून तब्बल 15 ते 25 वर्षे सेवा बजावणाऱ्या विशेष पोलीस अधिकारी (SPO) कर्मचाऱ्यांनी आता प्रशासनाकडे न्यायाची याचना केली आहे. “नक्षलविरोधी मोहिमेत आयुष्य घालवलं, पण आज आमच्यावर उपासमारीची वेळ आली,” अशी वेदनादायी भावना व्यक्त करत अहेरी, सिरोंचा, एटापल्ली, कोरची, कुरखेडा, वडसा, मालेवाडा, कोटगुल, बेडगाव आदी भागातील SPO कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले.
सदर निवेदनात कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे की, सन 1997 ते 2010 दरम्यान केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयानुसार नक्षल बेल्टमध्ये “खबरी विशेष पोलीस अधिकारी (SPO)” म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. पोलीस मदत केंद्र, पोस्टे व उपपोस्टे येथे त्यांनी अत्यंत धोकादायक परिस्थितीत सेवा बजावली. सुरुवातीला केवळ 3 हजार रुपयांवर काम सुरू केलेल्या या कर्मचाऱ्यांना सध्या 10 हजार रुपये मानधन मिळत होते.
मात्र, मे 2025 पासून अचानक मानधन बंद झाल्याने SPO कर्मचाऱ्यांसमोर गंभीर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. “पोलीस अधीक्षक कार्यालयात वारंवार विचारणा करूनही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. कुटुंब चालवणे कठीण झाले असून उपासमारीची वेळ आली आहे,” असा आरोप त्यांनी निवेदनातून केला आहे.
विशेष म्हणजे, काही SPO कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची नक्षलवाद्यांकडून हत्या झाल्यानंतर त्यांच्या वारसांना SPO म्हणून नियुक्ती देण्यात आल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे शासनाने आपल्या सेवेला मान्यता देऊन पूर्ववत नियुक्ती द्यावी व मे 2025 पासूनचे थकीत मानधन तातडीने अदा करावे, अशी मागणी करण्यात आली आहे,अन्यथा मोठे आंदोलन करू असा इशारा आझाद समाज पार्टीचे जिल्हा युवाअध्यक्ष विवेक खोब्रागडे यांनी दिले आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे नक्षलग्रस्त भागात वर्षानुवर्षे सेवा देणाऱ्या SPO कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.