चामोर्शी : नुकत्याच जाहीर झालेल्या दहावी व बारावी बोर्ड परीक्षेच्या निकालात जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, चामोर्शीने उल्लेखनीय यश संपादन करत आपला शैक्षणिक दर्जा पुन्हा अधोरेखित केला आहे. विद्यालयाचा दहावीचा निकाल ८० टक्के तर बारावी विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दहावी परीक्षेत नंदिनी चंद्रकांत लटारे हिने ८१ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. अक्षरा रमेश मडावी हिने ७० टक्के गुणांसह द्वितीय, तर प्राजक्ता गव्हारे हिने ६९ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला. बारावी विज्ञान शाखेत मध्य हर्ष विद्युत हालदार याने ८० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. कु. स्नेहल उंदीरवाडे हिने ७६ टक्के गुण मिळवत द्वितीय, तर कु. सात्विका रमेश अग्गु हिने ७५.३३ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला. कु. दिया तपन दास हिने ७४ टक्के गुणांसह चतुर्थ, क्रिश हलदार याने ७४.३३ टक्के गुणांसह पंचम, तर ध्रुव प्रांजय वडेट्टीवार याने ७० टक्के गुणांसह सहावा क्रमांक मिळवून विद्यालयाचा नावलौकिक वाढविला. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा विद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी श्री चंद्रशेखरजी मस्के उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून श्री उत्पलजी मंडल, श्री पुरुषोत्तमजी घ्यार (सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती) तसेच पालक सदस्य श्री रमेशजी मडावी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक अविनाश तालापल्लीवार होते. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या यशोगाथा आणि अनुभव व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रेरणा देत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नेत्रा वडेट्टीवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन पदमा शिवरकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ज्येष्ठ शिक्षिका हर्षा रंदये, संगिता टीचकुले, अश्विनी नारा, रितिक पीपरे आणि श्रीमती मनीषा आभारे यांनी विशेष परिश्रम घेतले.