Homeगडचिरोलीदहावी निकालात मुलींची पुन्हा बाजी; कारमेल हायस्कूल ची समृद्धी बोनगिरवार जिल्ह्यात...

दहावी निकालात मुलींची पुन्हा बाजी; कारमेल हायस्कूल ची समृद्धी बोनगिरवार जिल्ह्यात अव्वल.

सोनू वाळके, उपसंपादक, लोकवाद न्युज.

 

गडचिरोली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या दहावीच्या निकालात गडचिरोली जिल्ह्याचा निकाल ८२.१८ टक्के लागला असून, यंदाही मुलींनीच बाजी मारत मुलांच्या तुलनेत तब्बल १० टक्क्यांनी अधिक यश मिळवले आहे. चामोर्शी येथील कार्मेल हायस्कूलची विद्यार्थिनी समृद्धी बोनगिरवार हिने ९७.२० टक्के गुण मिळवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
जिल्ह्यातून यंदा १४ हजार ४१४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १४ हजार ७६ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले. यात ७ हजार १२५ मुले आणि ६ हजार ९५१ मुलींचा समावेश होता. निकालानुसार ११ हजार ५६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ८७.०९ इतकी राहिली, तर मुलांचे प्रमाण ७७.४० टक्क्यांवर स्थिरावले.
विशेष म्हणजे, १ हजार ३५७ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवत ‘विशेष प्राविण्य’ श्रेणीत स्थान मिळवले आहे. तसेच ३ हजार ९२८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ४ हजार ७८२ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर १ हजार ५०२ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
नागपूर विभागात जिल्हा पुन्हा तळाला
गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालात किंचित घसरण झाली असून, नागपूर विभागात गडचिरोली जिल्हा पुन्हा एकदा शेवटच्या स्थानी राहिला आहे. विशेष म्हणजे, बारावीच्या निकालातही जिल्ह्याला शेवटचे स्थान मिळाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
आरमोरी तालुका अव्वल; मुलचेरा सर्वात मागे
तालुकानिहाय निकालात आरमोरी तालुक्याने ८५.२० टक्के निकालासह जिल्ह्यात प्रथम स्थान पटकावले. त्याखालोखाल अहेरी (८४.९३ टक्के), देसाईगंज (८३.९९ टक्के) आणि गडचिरोली (८३.९६ टक्के) तालुक्यांनी चांगली कामगिरी नोंदवली. दुसरीकडे मुलचेरा तालुक्याचा निकाल ७६.४० टक्के इतका लागून तो जिल्ह्यात सर्वात शेवटी राहिला. एटापल्ली (७७.९७ टक्के) आणि सिरोंचा (७८.६७ टक्के) या दुर्गम तालुक्यांची कामगिरीही सरासरीपेक्षा कमी राहिली.
निकालाचा घसरता आलेख चिंताजनक
गेल्या तीन वर्षांतील निकालाचा आलेख पाहता जिल्ह्यातील शैक्षणिक घसरण स्पष्ट दिसून येते. २०२४ मध्ये जिल्ह्याचा निकाल विक्रमी ९४.६७ टक्के होता. मात्र २०२५ मध्ये तो ८२.६७ टक्क्यांवर घसरला आणि यंदा आणखी कमी होत ८२.१८ टक्क्यांवर पोहोचला आहे.
दरम्यान, पुनर्परीक्षेला बसलेल्या ४५६ विद्यार्थ्यांपैकी १२९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यात ७५ मुले आणि ५४ मुलींचा समावेश आहे. नागपूर विभागातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोलीला शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी अजून मोठी मजल मारावी लागणार असल्याचे या निकालावरून स्पष्ट होत आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments