सोनू वाळके, उपसंपादक, लोकवाद न्युज.
गडचिरोली : उपचाराअभावी महिलेचा झालेला मृत्यू हा केवळ दुर्दैवी अपघात नसून आरोग्य व्यवस्थेतील निष्काळजीपणा आणि प्रशासनाच्या उदासीनतेचा थेट परिणाम असल्याचा घणाघाती आरोप करत NSUI जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे यांनी प्रशासनावर तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे. दोषी डॉक्टर आणि अधिकाऱ्यांवर केवळ निलंबनाची सौम्य कारवाई न करता थेट बडतर्फी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
राहुल वैरागडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील अनेक शासकीय विभागांमध्ये काही अधिकारी स्वतःला ‘राजा’ समजून सामान्य नागरिकांशी वागत आहेत. मात्र लोकशाही व्यवस्थेत अधिकारी हे जनतेचे सेवक आहेत, शासक नाहीत, याची जाणीव प्रशासनाने ठेवावी. सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या निष्क्रिय आणि बेजबाबदार अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे प्रकार तात्काळ थांबवले पाहिजेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी, अपुरी सुविधा आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे सामान्य नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याचा आरोप करत त्यांनी सरकार आणि आरोग्य विभागावरही टीका केली. “जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा, दोषींना वाचवणे थांबवा आणि आरोग्य व्यवस्थेत तातडीने सुधारणा घडवा,” अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, या घटनेमुळे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून प्रशासनाने आता तरी जागे होऊन नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न गांभीर्याने घ्यावेत, अशी भावना सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे.