Homeगडचिरोलीगरीबांच्या अश्रूंना खाकीचा आधार; चामोर्शीत पोलिसांनी जपली माणुसकीची ओळख

गरीबांच्या अश्रूंना खाकीचा आधार; चामोर्शीत पोलिसांनी जपली माणुसकीची ओळख

सोनू वाळके, उपसंपादक, लोकवाद न्युज.

चामोर्शी | दि. ३ :
समाजात पोलीस म्हणजे केवळ कारवाई, दबाव आणि भीतीचं प्रतीक असा गैरसमज वाढत असताना, चामोर्शी येथे घडलेल्या एका घटनेने या समजुतीला ठाम छेद दिला आहे. चामोर्शी पोलीस ठाण्यात आपल्या दोन लहान मुलांसह कौटुंबिक तक्रार मांडण्यासाठी आलेल्या एका गरजू महिलेच्या कुटुंबाला पोलिसांनी दिलेला आधार हा माणुसकीचा जिवंत नमुना ठरला आहे.
भंगारपेठ (ता. गोंडपिपरी, जि. चंद्रपूर) येथील व मूळ मुरखळा (माल), ता. चामोर्शी येथील रहिवासी प्रतिभा जितेंद्र फलके या आपल्या मुलांसह पोलीस ठाण्यात आल्या होत्या. चेहऱ्यावर चिंता, डोळ्यांत अश्रू आणि मुलांच्या अवस्थेतून स्पष्ट दिसणारी उपासमार—ही परिस्थिती पाहून पोलीस निरीक्षक दीपक डोंब यांचे मन हेलावले.
नियमांच्या चौकटीत अडकून न पडता त्यांनी माणुसकीचा मार्ग निवडला. त्यांनी केवळ तक्रार ऐकून घेतली नाही, तर त्या कुटुंबाच्या वेदना समजून घेत मदतीचा हात पुढे केला. १३ वर्षीय सगुणाच्या “छानसा ड्रेस” या साध्या इच्छेची पूर्तता करत निरीक्षकांनी स्वतः तिला कपडे घेऊन दिले. तर खेळाची आवड असलेल्या ओमकारच्या हातात बॅट आणि बॉल देत त्याच्या स्वप्नांना नवी उभारी दिली.
या छोट्याशा मदतीमुळे त्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद अवर्णनीय होता. “जिथे अपेक्षा संपतात, तिथे मदतीचा हात देवासारखा वाटतो,” याचा प्रत्यय या घटनेतून आला. त्या दिवशी पोलिसच त्या कुटुंबासाठी देवदूत ठरले.
या वेळी पोलीस कॉन्स्टेबल हर्षाली सहारे तसेच सोशल मीडिया काँग्रेस तालुका अध्यक्ष विजय लाड उपस्थित होते. त्यांच्या साक्षीने घडलेली ही घटना समाजाला एक सकारात्मक संदेश देणारी ठरली आहे.
आज सोशल मीडियावर पोलीसांवर टीका करणाऱ्यांची संख्या वाढत असली, तरी अशा घटनांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण ही घटना स्पष्ट सांगते—“पोलीस फक्त कायदा राबवत नाहीत, तर माणुसकीही जपतात!”
चामोर्शी परिसरातील ही घटना म्हणजे केवळ मदत नव्हे, तर मानवतेचा विजय असून, पोलिसांच्या या संवेदनशील कृतीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments