चामोर्शी : आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक ( NMMS ) विद्यार्थ्यांसाठी आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेत यशोधरा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करून विद्यालयाच्या शिरपेच्यात मानाचा तुरा खोवला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे विद्यालय परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या परीक्षेत एकूण २२ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी गणेश मनोज दुधबावरे , गोपिचंद यादव बोरकर , हेमंत शेषांत बारसागडे व जानवी महादेव पासांडे हे ४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यातील गणेश दुधबावरे व गोपिचंद बोरकर या २ विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत शिष्यवृत्ती मिळवण्याचा मान मिळवला आहे. विद्यार्थ्यांच्या यशामागे त्यांची मेहनत, शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य महत्त्वाचे घटक ठरले. याप्रसंगी राहुल लोक विकास मंडळाच्या अध्यक्षा कौशल्या सहारे , सचिव विवेक सहारे कोषाध्यक्ष वक्टुजी उंदिरवाडे, माणिक साखरे तथा पदाधिकारी , विद्यालयाचे प्राचार्य शाम रामटेके व शिक्षक वृंदानी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच शिक्षकवृंदांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले. या यशामुळे यशोधरा विद्यालयाचे नाव परिसरात गौरवाने घेतले जात असून, इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे.