🔴 गांधी चौकात अतिक्रमणावर बुलडोझर; जिल्हा परिषद जागा वाचली
मूल : शहरातील मध्यवर्ती गांधी चौक येथे जिल्हा परिषद मालकीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेवर अवैध बांधकामाचा प्रयत्न उघडकीस येताच प्रशासनाने तातडीने कारवाई करत अतिक्रमण हटविले. काँग्रेस नेते संतोष रावत यांच्या नावाशी संबंधित हा प्रकार उघड झाल्यानंतर राजकीय व प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, गांधी चौकातील अत्यंत मोक्याच्या जागेवर बेकायदेशीर ताबा घेऊन बांधकाम सुरू करण्यात आले होते. याची माहिती मिळताच भाजपाचे शहराध्यक्ष प्रविण मोहुर्ले व नगरसेविका प्राची आक्केवार यांनी तत्काळ जिल्हा परिषद प्रशासनाकडे धाव घेत लेखी तक्रार दाखल केली.
तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी संबंधितांना नोटीस बजावत काम तात्काळ थांबविण्याचे आदेश दिले. मात्र, आदेशांकडे दुर्लक्ष करून बांधकाम सुरूच ठेवण्यात आल्याने प्रशासनाने कठोर भूमिका घेतली.
प्रचंड पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने अखेर हे अतिक्रमण हटविण्यात आले. या कारवाईमुळे सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करण्यात प्रशासनाला यश आले असून, राजकीय प्रभावाचा वापर करून नियमबाह्य कामे करण्याचा प्रयत्न फोल ठरला.
दरम्यान, या प्रकरणात वेळीच हस्तक्षेप करून प्रशासनाचे लक्ष वेधल्याबद्दल भाजपाचे शहराध्यक्ष प्रविण मोहुर्ले व नगरसेविका प्राची आक्केवार यांच्या कार्याचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.







